१० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; ८-अ नोंदीच्या दुरुस्तीसाठी मागितली होती लाच

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

 

बुलढाणा: गावठाण शेतातील जागेची नमुना ८-अ ची नोंद रद्द करून त्याचा दुरुस्ती अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज रंगेहात अटक केली. विजय माधव गवई (वय ४१) असे या लोकसेवकाचे नाव असून, ते ग्रामपंचायत कार्यालय पारखेड येथे कार्यरत असून त्यांच्याकडे गारडगावचा अतिरिक्त प्रभार आहे.

​तक्रारदार यांच्या गावाबाहेर असलेल्या गावठाण शेतातील जागेची नमुना ८-अ ची नोंद रद्द करणे आणि त्याबाबतचा दुरुस्ती अहवाल वरिष्ठांना सादर करणे आवश्यक होते. या कामासाठी ग्रामसेवक विजय गवई यांनी तक्रारदाराकडे ३०,०००/- रुपयांची लाचेची मागणी केली होती.

​याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. २-५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, गवई यांनी ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते.

​मिळालेल्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, आज दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, खामगाव येथे एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून १०,००० रुपये लाच स्वीकारताना विजय गवई यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. सध्या त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​ही धडक कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, आणि बुलढाण्याचे पोलीस उपअधिक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे, दीपक जाधव, जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, नितीन शेटे आणि अर्शद शेख यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

एसीबीचे आवाहन: कोणत्याही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा.

  • दूरध्वनी: ०७२६२-२४२५४८
  • व्हॉट्सॲप: ९४०५०९१०६४
  • टोल फ्री क्रमांक: १०६४

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!