या कारणाने चौथीच्या चिमुरड्याला शिक्षकाची अमानुष मारहाण
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा जि.प. शाळेतील संतापजनक प्रकार; विद्यार्थी रुग्णालयात दाखल

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
खामगाव: शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असतानाही, शिक्षकांकडून होणारी अमानुष मारहाण थांबण्याचे नाव घेत नाहीये. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका साडेनऊ वर्षीय विद्यार्थ्याला गणित न आल्याने शिक्षकाने इतकी अमानुष मारहाण केली की, या विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव राजा जिल्हा परिषद शाळेत पवन इंगळे (वय ९.५ वर्षे) हा विद्यार्थी चौथीच्या वर्गात शिकतो. वर्गात गणित शिकवत असताना पवनला गणित न आल्याने संतापलेले वर्गशिक्षक रवींद्र ची यांनी त्याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की पवन गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत.
शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
या धक्कादायक प्रकाराची माहिती पिंपळगाव राजा पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने शाळेत धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याची प्रकृती पाहता पोलिसांनी त्याला तत्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी दाखल केले. सध्या या चिमुरड्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
-कारवाईकडे सर्वांचे लक्ष-
विशेष म्हणजे, १३ डिसेंबर रोजीच राज्य सरकारने विद्यार्थी सुरक्षेबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या शिक्षकाने सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. अद्यापही पोलीस किंवा शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकावर ठोस कारवाई केलेली नाही. “वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात येईल,” असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पालकांचा संताप: “एका साडेनऊ वर्षांच्या मुलाला गणितासाठी अशा प्रकारे मारहाण करणे ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. अशा निर्दयी शिक्षकाची सेवा त्वरित समाप्त करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी,” अशी मागणी पालकांनी केली आहे.




