अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास; बुलढाणा पोक्सो न्यायालयाचा निकाल

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​बुलढाणा: अल्पवयीन पुतणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपी काकास येथील जिल्हा व सत्र न्यायालय-३ तथा विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश श्री. रविकुमार केशरमल शर्मा यांनी दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

देऊळघाट (ता. जि. बुलढाणा) येथील आरोपी सतिष शंकर खंडारे (वय ३२ वर्षे) याने ३ एप्रिल २०२१ रोजी रात्री ११:०० वाजताच्या सुमारास घरात कोणीही नसताना अल्पवयीन पुतणीवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केले. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकीही त्याने दिली. त्यानंतर आरोपीने वारंवार घरात कोणी नसताना पीडितेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईने विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

​त्यानंतर पीडितेच्या आईने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३७६, ३७६(२)(फ), ३७६(२)(जे), ३७६(२)(एन), ३७६(३), ५०६ सहकलम ३, ४, ५ (एल)(एन)(पी), ६ पोक्सो ॲक्टनुसार गुन्हा नोंदवला होता.

-​ न्यायालयात १० साक्षीदार तपासले –

पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संतोष मुलचंद खत्री यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. यामध्ये पीडिता आणि तिच्या आईची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.

विशेष न्यायाधीश रविकुमार केशरमल शर्मा यांनी आरोपी सतिष खंडारे यास पोक्सो ॲक्टच्या कलम ६ अंतर्गत दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास व २,००० रुपये दंड, तसेच भा.दं.वि. कलम ५०६ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व १,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असून, दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ​या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून सहायक फौजदार शेखर थोरात यांनी सहकार्य केले.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!