चिखली तालुका हादरला:सोमठाण्यात आई, सख्खा भाऊ आणि पुतण्याची निर्घृण हत्या; शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; आरोपी दीपक सुरडकर फरार, पोलिसांकडून शोध सुरू

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
चिखली: तालुक्यातील सोमठाणा येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदाती आई, सख्खा भाऊ आणि निष्पाप पुतण्याचा जीव घेऊन संशयित आरोपी दीपक फत्तेसिंह सुरडकर घटनास्थळावरून फरार झाला असून, या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.सरस्वती फत्तेसिंह सुरडकर (वय ७० वर्षे, आई), संजय फत्तेसिंह सुरडकर (वय ५५ वर्षे, भाऊ), रणजीत संजय सुरडकर (वय २५ वर्षे, पुतण्या) असे मृतकाची नावे आहेत
प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबात शेतजमिनीच्या वाटपावरून अंतर्गत वाद सुरू होता. संशयित आरोपी दीपक याच्या वाट्याची शेती आईने दुसरा मुलगा संजय यांच्या नावावर केल्याचा राग दीपकच्या मनात खदखदत होता. याच वादाचे पर्यवसान अखेर या रक्तरंजित संघर्षात झाले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. रागाच्या भरात दीपकने आई सरस्वतीबाई, भाऊ संजय आणि पुतण्या रणजीत यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करून त्यांना जागीच ठार केले.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. हत्येमागील निश्चित कारण आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या सखोल तपासाअंतीच स्पष्ट होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. एकाच घरातील तीन पिढ्यांचा अंत झाल्याने सोमठाणा गावावर शोककळा पसरली आहे.




