“कार्यकर्त्यांसाठी ३५ कोटींच्या कामाचे ‘कमिशन’ सोडले” आ.संजय गायकवाडांच्या विधानाने राजकीय भूकंप! आ. गायकवाडांच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका; मागितली श्वेतपत्रिका

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: चिखली विधानसभा मतदारसंघातील उदयनगर येथे आयोजित एका पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका विधानाने संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. “कार्यकर्त्यांसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचे कमिशन सोडले” या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होताच महायुतीमधील अंतर्गत कलह आणि विरोधकांचे आरोप यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काय म्हणाले आहे आमदार संजय गायकवाड?

​उदयनगर येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार गायकवाड म्हणाले, “सुमारे ३५ कोटी रुपयांचे कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी सोडले आहे. पूर्वी सायकलवर फिरणारे माझे कार्यकर्ते आज सक्षम झाले आहेत. कार्यकर्ता मजबूत असेल तरच नेता मजबूत राहतो. मी महाराष्ट्रातील दमदार आमदारांपैकी एक आहे.” त्यांच्या या विधानामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, ही ‘कमिशनखोरीची कबुली’ असल्याचा आरोप होत आहे.

आमदारांचे स्पष्टीकरण

​वादाचा अंदाज येताच आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मी ३५ कोटी रुपयांची कामे कार्यकर्त्यांना दिली आहेत, जेणेकरून त्यांना रोजगार मिळेल. बोलण्याच्या ओघात ‘कमिशन’ हा शब्द चुकीने वापरला गेला,” असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

“आमदारांची बोबडी वळली, त्यांना ‘गेट वेल सून’च्या शुभेच्छा!” – हर्षवर्धन सपकाळ

​आमदार गायकवाड यांच्या या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे. सपकाळ म्हणाले की, “३५ कोटी कमिशनच्या वक्तव्यानंतर आमदारांची कशी बोबडी वळली हे मी ऐकलं. त्यांना मी ‘गेट वेल सून’ अशा शुभेच्छा देतो. त्यांनी मतदारसंघातील कामांची श्वेतपत्रिका जाहीर करावी.”
​सपकाळ यांनी पुढे गंभीर आरोप करत म्हटले की, “ते फक्त जावई आणि नातेवाईकांनाच ठेके देतात, सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणताही ठेका मिळत नाही. ठेके आणि वरली मटक्यातून येणारा काळा पैसा त्यांच्या डोक्यात घुसला आहे. त्यांच्याबद्दल आता केवळ सहानुभूती आणि कीवच वाटते. अशा विकृत मानसिकतेचा आम्ही निषेध करतो.”

महायुतीत खळबळ आणि अंतर्गत मतभेद

​या विधानामुळे केवळ विरोधकच नाही, तर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपामध्येही नाराजीचे सूर उमटत आहेत. विशेषतः चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्यावर नाव न घेता करण्यात आलेल्या टीकेमुळे युतीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर या ‘कमिशन’ प्रकरणाचा फटका कोणाला बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!