BIG BREAKING:पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांची ‘दांडी’; अधीक्षक अभियंत्यासह उपकार्यकारी अभियंत्याला नोटीस बजावण्याचे निर्देश

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांच्या दौऱ्यातच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदारपणाची गंभीर दखल घेत मदत, पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता धनंजय अहिरे आणि देऊळगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास बडगू यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
पालकमंत्री मकरंद पाटील हे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर सिंदखेडराजा येथील विश्रामगृहावर आढावा बैठकीदरम्यान युवा शेतकऱ्यांनी शेतीपंपांसाठी डीपी (ट्रान्सफॉर्मर) वेळेवर न मिळणे आणि महावितरणच्या ढिसाळ कारभाराबाबत तक्रारींचा पाढा वाचला.
शेतकऱ्यांच्या या तक्रारींवर उत्तर मागण्यासाठी पालकमंत्र्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता धनंजय अहिरे यांचा पुकारा केला; मात्र ते दौऱ्यात अनुपस्थित असल्याचे समोर आले. त्यानंतर देऊळगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास बडगू यांचा शोध घेतला असता तेही गैरहजर असल्याचे आढळले.मात्र काही वेळानंतर उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास बडगू हे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या समोर हजर झाल्यानंतर पालकमंत्री व आमदार मनोज कायंदेंनी युवा शेतकऱ्यांची तक्रारींचा निरासारण करण्याचे निर्देश दिले.
‘छातीत दुखण्याचा’ बहाणा हँडफ्री फोनमुळे उघड
उपकार्यकारी अभियंता बडगू यांच्या अनुपस्थितीबाबत उपस्थित कनिष्ठ अभियंता (जेई) होले यांनी “त्यांच्या छातीत दुखत आहे,” असा बहाणा पालकमंत्री व आमदार मनोज कायंदे यांच्यासमोर केला. मात्र, शंका आल्याने आमदार कायंदे यांनी तात्काळ बडगू यांना थेट फोन लावला आणि तो स्पीकरवर (हँडफ्री) टाकला. आमदारांनी तब्येतीची विचारपूस करताच पलीकडून बडगू यांनी “माझी तब्येत एकदम ठीक आहे,” असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला आणि त्यांचा खोटेपणा उघड झाला.
अधिकाऱ्यांचा हा आडमुठेपणा आणि गैरहजर राहण्याची सवय पाहून पालकमंत्री मकरंद पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी तिथे उपस्थित असलेले जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे यांना या दोन्ही दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
दरम्यान, या प्रकरणावर अधीक्षक अभियंता धनंजय अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता, “मी बुलढाणा येथे उपस्थित होतो, प्रशासनाकडून नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्याला रीतसर उत्तर दिले जाईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सध्या जिल्ह्यात पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. शासन थेट बांधावर जाऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी जराही संवेदनशीलता उरलेली नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. आता या अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासन नेमकी काय कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




