BREAKING NEWS: आ. श्वेता महाले यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्यावर बुलढाण्यात गुन्हा दाखल

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या विधानामुळे महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आ. गायकवाड यांच्याविरुद्ध मध्यरात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रॅलीमध्ये ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर आ. श्वेता महाले यांनी ठेका धरला होता. या घटनेचा संदर्भ देत माध्यमांशी बोलताना आ. संजय गायकवाड यांनी, “बाप तो बाप है, पण बापासारखं शरीर आणणार कुठून?” अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती.
हे वक्तव्य जाहीरपणे करून महिलांच्या शरीरयष्टीवरून त्यांचा अवमान करण्यात आला असून ते स्त्री लज्जेस धक्का पोहोचवणारे आहे, असा आरोप एका महिलेने केला. संबंधित महिलेने तत्काळ बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून आ. गायकवाड यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मध्यरात्री आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



