बुलढाणा आठवडी बाजारात बैठक वसुली ठेकेदारांची दादागिरी; २० रुपयांऐवजी १०० ते २०० रुपयांची पठाणी वसुली! मुख्याधिकाऱ्यांकडे ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची व्यावसायिकांची मागणी

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात परगावातून आलेल्या छोट्या व्यावसायिकांना बाजार बैठक वसुली ठेकेदाराच्या दादागिरीचा सामना करावा लागत असल्याचा व नगर परिषदेचे नियम धाब्यावर बसवून अधिकृत पावती दरापेक्षा तब्बल पाच ते दहा पट अधिक म्हणजेच १०० ते २०० रुपयांची पठाणी वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
बुलढाणा शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात स्थानिक विक्रेत्यांसह आसपासच्या तालुक्यांतून शेकळों व्यावसायिक आपला माल विक्रीसाठी घेऊन येतात. नगर परिषदेने आठवडी बाजार बैठक आणि आठवडी बाजार व्यतिरिक्त बैठक शुल्क वसुलीचे कंत्राट लिलावाद्वारे ठेकेदाराला दिले आहे. नियमानुसार आठवडी बाजाराच्या दिवशी प्रति दुकान २० रुपये आणि इतर दिवशी १० रुपये बैठक शुल्क आकारण्याचे स्पष्ट आदेश आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्टेट बँकेच्या बाजूला खामगाव येथून आलेले १७ ते १८ चप्पल, बूट व सँडल विक्रेते दुकान लावून बसतात. आज ३० ऑगस्ट रोजी संबंधित ठेकेदार व ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी या विक्रेत्यांना कोणतीही सही किंवा शिक्का नसलेली २० रुपयांची पावती देऊन थेट १०० ते २०० रुपयांची मागणी केली. या वाढीव वसुलीला विरोध केला असता, ठेकेदार व ठेकेदाराच्या माणसांनी व्यावसायिकांच्या दुकानातील साहित्याची फेकाफेक केली आणि ‘पैसे देत नसाल तर दुकाने लावू नका’ अशी दमदाटी केली, असा आरोप खामगाव येथील व्यावसायिक अनिल चव्हाण यांच्यासह इतर दुकानदारांनी केला असून या दादागिरीचा व्हिडिओसुद्धा व्यावसायिकांनी तयार केला आहे.
या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.




