विराज प्रोफाईल्स कंपनीतील कथित मानसिक छळाला कंटाळून प्रदीप जाधव नामक इंजिनियरची आत्महत्या! पत्रकार संजय जाधव यांचे भाऊ आहे इंजिनियर प्रदीप जाधव…

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा / बोईसर: बोईसर येथील नामांकित ‘विराज प्रोफाईल्स स्टेनलेस स्टील’ कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले आणि मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रदीप सुखदेव जाधव यांनी कंपनीतील कथित मानसिक छळ आणि त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून, जाधव कुटुंबीयांनी कंपनीच्या मालकासह नऊ जणांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.इंजिनियर प्रदीप सुखदेव जाधव हे पत्रकार संजय जाधव यांचे भाऊ असून या घटनेमुळे जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप जाधव हे गेल्या सात वर्षांपासून बोईसर येथील विराज प्रोफाईल्स कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदावर कार्यरत होते. मात्र, कंपनीचे मालक नीरज कोच्चर, सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग यांच्यासह काही वरिष्ठांकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांना जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या.
१९ जून रोजी प्रदीप जाधव यांना कंपनी मालकाच्या बंगल्यावर बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. या बैठकीत सीईओसह एकूण नऊ जण उपस्थित होते. तेथे प्रदीप जाधव यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला व त्यांना ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न झाला, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या मानसिक धक्क्यातूनच प्रदीप जाधव यांनी थेट आपल्या फ्लॅटवर जाऊन आत्महत्या करण्यापूर्वी सविस्तर सुसाईड नोट लिहिली आणि गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
सुसाईड नोट जप्त; बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे. या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित त्रासाचा सविस्तर उल्लेख करण्यात आल्याचे समजते. प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोईसर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; अधिवेशनात चर्चेची मागणी
प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव आणि मुलगा यश जाधव यांनी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पीडित कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे.
सध्या राज्यात सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात या प्रकरणावर सविस्तर चर्चा होऊन जाधव कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच खासगी कंपन्यांमध्ये अधिकारी व कामगारांवर होणाऱ्या कथित मानसिक छळाविरोधात सरकारने कठोर कायदा करावा, अशी मागणी आता बुलढाणा जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे.
पोलीस तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
बोईसर पोलीस आता पोस्टमार्टम अहवाल आणि हस्तगत केलेल्या सुसाईड नोटच्या आधारे विराज प्रोफाईल्स कंपनीच्या मालकासह संबंधित नऊ जणांवर काय आणि कधी कारवाई करतात, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




