बुलढाण्याच्या प्रभाग क्र.३ च्या नागरिकांचा संताप बंद केला मुख्य रस्ता! नगरसेवक अनिल वर्मा यांना रहिवाशांनी धरले धारेवर

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामात कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने, अखेर संतप्त नागरिकांनी टिपू सुलतान चौक ते मिर्झा नगर हा मुख्य रस्ताच दगड आणि राडारोडा टाकून बंद केला. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बुलढाणा शहरात सध्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रभाग ३ मध्येही हे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, हे काम करताना कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. पाईपलाईनसाठी मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.हे अतिक्रमणचे भंगार रस्त्यावर पडल्याने ज्यामुळे नागरिकांना साधे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभाग ३ चे नगरसेवक अनिल वर्मा हे घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. “कंत्राटदार मनमानी करत असताना प्रशासन काय करत आहे?” असा सवाल करत संतप्त रहिवाशांनी त्यांना जाब विचारला. कामातील दिरंगाई आणि नियोजनाचा अभाव यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप पाहायला मिळाला.

​नागरिकांच्या प्रमुख मागण्या आणि तक्रारी:

१. भंगाराची विल्हेवाट लावा: रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्यानंतर त्याचे लोखंडी भंगार आणि इतर साहित्य रस्त्यावरच तसेच पडून आहे, ते तातडीने उचलण्यात यावे.

२. नळ जोडणी द्या: नवीन पाईपलाईन टाकून झाली असली तरी, अद्याप घराघरांना नळ जोडणी (Connections) देण्यात आलेली नाही.

३. रस्त्याची दुरुस्ती: खोदकामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून अपघाताची शक्यता वाढली आहे.

​-आक्रमक पवित्रा आणि रस्ता केला बंद-

प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने रहिवाशांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. टिपू सुलतान चौक ते मिर्झा नगर या मुख्य रस्त्यावर नागरिकांनी अतिक्रमणाचे भंगार साहित्य आणि मोठमोठे दगड आणून टाकले आणि रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला. जोपर्यंत कामाचे योग्य नियोजन होऊन समस्या मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

​आता या आंदोलनानंतर झोपलेले प्रशासन आणि कंत्राटदार तातडीने कारवाई करणार का? प्रभाग ३ मधील नागरिकांना या नरकयातनेतून मुक्ती मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!