अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघांवर ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल; मुख्य आरोपीसह तिघेही फरार

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
मलकापूर: घरात ये-जा करण्याचा फायदा घेत एका ३५ वर्षीय नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दाताला येथून उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी तौफिक शाह अताउल्हा शाह उर्फ शाहरुख याच्यासह त्याला साथ देणाऱ्या अन्य दोन साथीदारांवर ‘पोस्को’ (POCSO) कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मलकापूर ग्रामीण भाग दाताळा राहते. सन २०२५ मध्ये पीडितेच्या घराचे बांधकाम सुरू असताना, तिच्या वडिलांचा नातेवाईक असलेला आरोपी तौफिक शाह अताउल्हा शाह उर्फ शाहरुख (वय ३५ वर्ष, रा. पारपेठ, मलकापूर) हा त्यांच्या घरी नेहमी येत असे. यातूनच त्याची पीडितेशी ओळख झाली. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही आरोपीने पीडितेच्या घरी येणे सुरूच ठेवले होते.
डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेचे आई-वडील कामावर गेले असताना, आरोपी तौफिक शाह याने आपल्या दोन साथीदारांसह (मुज्जू शाह साबीर शाह आणि शाकीर शाह) पीडितेचे घर गाठले. यावेळी इतर दोघे बाहेर उभे राहिले, तर तौफिक शाह याने पीडितेचा हात धरून तिला बळजबरीने घरात ओढून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडील व भावाला आणि तुलाही जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. या भीतीमुळे पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही. त्यानंतर जानेवारी २०२६ पासून आरोपीने पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत वारंवार तिच्यावर अत्याचार केले.दरम्यान ११ मे रोजी पीडितेने जेवण करण्यास नकार दिल्याने आणि तिची प्रकृती खालावल्याने आई-वडिलांनी तिला मलकापूर येथील खाजगी दवाखान्यात नेले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे पालकांना सांगितले. यावेळी धक्का बसलेल्या पालकांनी मुलीला विचारणा केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला सर्व आपबिती सांगितली.यावरून पालकांनी पीडितेसोबत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून मुख्य आरोपी तौफिक शाह अताउल्हा शाह उर्फ शाहरुख, मुज्जू शाह साबीर शाह (रा. बुलढाणा, ह.मु. पारपेठ) आणि शाकीर शाह (रा. मुस्ताकअली नगर, मलकापूर) या तिघांविरुद्ध अत्याचार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.




