३५ प्रवाशांचे वाचले प्राण! समृद्धीवर ट्रॅव्हल्सला भीषण आग.

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

मेहकर :मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज सायंकाळी लोणार तालुक्यातील शिवनी पिसा शिवारात एका धावत्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, आग लागताच चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व ३० ते ३५ प्रवासी सुखरूप बाहेर पडले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार,एमएच ३८ एफ ३८९९ क्रमांकाची ही ट्रॅव्हल्स बस शनिवारी २ मे रोजी  सायंकाळी ५:४० वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरून जात होती. चॅनेल क्रमांक २९६, शिवनी पिसा शिवार (ता. लोणार) परिसरात बसचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्याच्या घर्षणामुळे बसने क्षणात पेट घेतला. बसमधून धुराचे लोट निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तातडीने बस बाजूला उभी केली आणि आरडाओरडा करून सर्व प्रवाशांना खाली उतरण्याचे आवाहन केले. आग इतकी भीषण होती की पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमधील प्रवासी जीव मुठीत धरून खाली उतरले. प्रसंगावधान राखल्यामुळे जीवितहानी टळली असली तरी, अनेक प्रवाशांचे सामान आगीत जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रशासनाची तत्परता

घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे पथक, महामार्ग पोलीस आणि समृद्धी महामार्ग प्रशासनाचे बचाव पथक रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी ती तत्काळ सुरळीत केली. सर्व प्रवाशांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची आणि प्रवासाची पर्यायी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!