मोताळा पंचायत समिती अभियंता सचिन इंगळे १० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

मोताळा: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (घरकुल) दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज रंगेहाथ अटक केली. सचिन इंगळे (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव असून, या कारवाईमुळे मोताळा पंचायत समितीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला त्यांच्या घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान हवे होते. हे अनुदान वितरित करण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता सचिन इंगळे याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बुलढाणा येथील ‘एसीबी’ कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

अभियंता सचिन इंगळे याने लाच देण्यासाठी बोलवले आपल्या ‘गावी’

एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज मोताळा पंचायत समिती परिसरात सापळा रचला होता. मात्र, संशय येऊ नये आणि आपण पकडले जाऊ नये यासाठी अभियंता इंगळे याने अत्यंत सावधगिरी बाळगत तक्रारदाराला आपल्या कंडारी (ता. खामगाव) या गावापासून ३ किलोमीटर अंतरावर पैसे घेऊन बोलावले. मात्र, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने इंगळे याला १० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक श्री. चोरमाले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वी केली. आरोपी सचिन इंगळे हा खामगाव तालुक्यातील कंडारी येथील रहिवासी असून तो मोताळा येथे कार्यरत होता. सरकारी कामासाठी सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांवर या कारवाईमुळे जरब बसणार आहे. सध्या या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!