पाम तेल विक्रीवर बंदी नाही; अन्न व औषध प्रशासनाचा खुलासा
बुलढाणा जिल्ह्यात खाद्यतेलात भेसळ नाही; मात्र अन्न विभागात 'दुष्काळ', १३ तालुक्यांसाठी केवळ ३ अधिकारी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: पाम तेलाच्या विक्रीवर प्रशासनाने बंदी घातल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. पाम तेल विक्रीवर कुठेही बंदी नसल्याचे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी नागरिकांमधील गैरसमज दूर केला आहे. तसेच, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या खाद्यतेलामध्ये कुठेही भेसळ आढळली नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत माहितीवरच भरवसा ठेवावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
-३१ कारवाया, ८ प्रकरणांत क्लीन चिट-
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत बुलढाणा जिल्ह्यात खाद्यतेल विक्रीसंदर्भात नियमित तपासण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३१ कारवाया करण्यात आल्या असून, त्यापैकी ८ प्रकरणांमध्ये तपासणीनंतर प्रमाणित स्पष्टता (क्लीन चिट) देण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक तपासणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
-प्रशासनाचा कारभार ‘रामभरोसे’-
एकीकडे भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. बुलढाणा हा १३ तालुक्यांचा विस्तीर्ण जिल्हा असतानाही, येथे अन्न विभागाचा गाडा केवळ तीनच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. नियमानुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे जिल्ह्यात किमान १३ अधिकारी असणे अपेक्षित आहे. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपासणी, नमुने घेणे आणि कारवाईच्या प्रक्रियेवर मोठा ताण येत आहे.
-मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची गरज-
नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ही रिक्त पदे तातडीने भरून काढण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
-तक्रार करण्याचे आवाहन-
“पाम तेलावर कोणतीही बंदी नाही, मात्र नियमांचे उल्लंघन, भेसळ किंवा दर्जाहीन खाद्यपदार्थ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांना कुठेही भेसळीचा संशय आल्यास त्यांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा,” असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.




