बुलढाणा नगर परिषदेची आज पहिलीच विशेष सभा; इतक्या विषयांवर होणार चर्चा!
भंगार दुकाने हलवण्यापासून ते सावरकर पुतळा उभारण्यापर्यंत अनेक विषय अजेंड्यावर; नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांची पहिलीच विशेष सभा..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज, २३ जानेवारी रोजी पहिलीच विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, १७ मुख्य विषय आणि आयत्या वेळेच्या विषयांसह अनेक विकासकामांवर या सभेत मोहोर उमटवली जाणार आहे.
शहरातील अतिक्रमण, पुनर्वसन, सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, भुयारी गटार योजना, विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता असे अनेक महत्वांच्या विषयांवर या सभेत चर्चा होऊन निर्णय होणार आहेत.
-शहराच्या चेहऱ्यामोहरा बदलणारे ‘हे’ आहेत मुख्य विषय-
भंगार दुकाने हद्दपार: शहरातील भंगार विक्रीची दुकाने बंद करून ती शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा महत्त्वाचा ठराव विषय क्र. १ नुसार मांडला जाईल.
झोपडपट्टी नियमितीकरण: घोषित व अघोषित झोपडपट्ट्यांमधील निवासी अतिक्रमणे नियमित करणे किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
ग्रेन मार्केट अतिक्रमण: ग्रेन मार्केटमधील अतिक्रमणे हनवतखेड येथील जागेवर हलवण्याचा प्रस्ताव आहे.
स्मारके आणि सुशोभीकरण: सावरकर पुतळा व संविधान स्मारक: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘अस्वलाची प्रतिकृती’ हटवून त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा, तर त्रिशरण चौकातील ‘बिबट्याची प्रतिकृती’ हलवून तिथे संविधान स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव सभेत येणार आहे.
महाराणा प्रताप स्मारक: त्रिशरण चौकाजवळ महाराणा प्रताप स्मारक व परिसराच्या सुशोभीकरणाचा विषय अजेंड्यावर आहे.
नागरी सुविधा आणि आरोग्य:भुयारी गटार योजना: शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेली ‘अंडरग्राउंड सीवेज सिस्टम’ (Under Ground Sewage system) राबवण्याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.
स्वच्छता व घनकचरा: घनकचरा व्यवस्थापनासाठी १० नवीन घंटागाड्या खरेदी करणे आणि वार्षिक साफसफाईचे कंत्राट देणे यावर चर्चा होईल. माळविहीर येथील घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्यावरही भर दिला जाणार आहे.
प्रशासकीय आणि विकास कामे: व्यावसायिक प्रकल्प: पडीत शासकीय जागा नगर परिषदेकडे हस्तांतरित करून ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर बहुउद्देशीय प्रकल्प उभारणे.
खरेदी-विक्री संघाची जागा: प्रभाग क्र. ६ मधील खरेदी-विक्री संघाची पडीत जागा संपादित करण्याबाबतचा विषय.
नगराध्यक्षांचे वाहन: अध्यक्षांच्या कार्यालयीन कामकाजासाठी भाडेतत्त्वावर चारचाकी वाहन घेण्याचा प्रस्तावही विषय क्र. १५ मध्ये समाविष्ट आहे.




