हॅलो बुलढाणा’चे संपादक जितेंद्र कायस्थ यांना मातृशोक; प्रयागबाई कायस्थ यांचे निधन

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा येथील ज्येष्ठ पत्रकार, ‘हॅलो बुलढाणा’चे संपादक आणि डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ यांच्या मातोश्री प्रयागबाई देवचंद कायस्थ यांचे रविवारी (२९ मार्च) रात्री ९:५० वाजता दुःखद निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने कायस्थ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बुलढाणा जिल्ह्याच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी घरामध्ये पूजा करत असताना देवघरातील दिव्यामुळे प्रयागबाई यांच्या साडीच्या पदराने पेट घेतला होता. या आगीत त्या सुमारे ४० टक्के भाजल्या होत्या. घटनेनंतर त्यांच्यावर तातडीने बुलढाणा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.नंतर बुलढाणा येथील डॉ.सौरभ संचेती यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पत्रकार व राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली
प्रयागबाई यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जितेंद्र कायस्थ व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
येथे होणार अंत्यसंस्कार
प्रयागबाई कायस्थ यांच्या पार्थिवावर सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता जुनी हिंदू स्मशानभूमी (इक्बाल चौक जवळ, बुलढाणा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




