जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन भोवले; चिखलीतील रेणुका पेट्रोल पंपावर गुन्हा दाखल

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

चिखली: जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन विक्रीबाबत दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सरळसरळ उल्लंघन करणाऱ्या जालना रोडवरील रेणुका पेट्रोल पंप मालकावर चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्लास्टिक कॅन किंवा इतर कोणत्याही भांड्यात इंधन विक्री करण्यास बंदी असताना, या पंपावर मोठ्या टाकीत व कैन मध्ये डिझेल/पेट्रोल भरून दिले जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

​जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी २६ मार्च २०२६ रोजी एक आदेश निर्गमित केला होता. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणत्याही पेट्रोल पंपावर प्लास्टिक बाटल्या, कॅन, डबे किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन देणे बेकायदेशीर असून, इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी रेणुका पेट्रोल पंप, जालना रोड येथे एका मोठ्या टाकीत इंधन भरून दिले जात असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि प्रशासनाच्या निदर्शनास आला.

प्रशासकीय कारवाईचा बडगा

​सदर व्हिडिओची शहानिशा केल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन आणि नागरी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पुरवठा निरीक्षक रविंद्र संजय वाघ यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून रेणुका पेट्रोल पंप मालकावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २२३ आणि २८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासनाचा इशारा

​इंधन विक्रीचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे इंधन पुरवठा करणाऱ्या इतर पंप चालकांचेही धाबे दणाणले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा महसूल व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!