उद्यापासून ‘इबादत’चा महिना; पवित्र रमजानुल मुबारकला उत्साहात सुरुवात; मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: मुस्लिम धर्मीयांचा अत्यंत पवित्र आणि संयमाचा महिना मानला जाणाऱ्या ‘रमजान मुबारका’ला उद्यापासून (दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ ) सुरुवात होत आहे. आज चंद्रदर्शन (चांद रात) झाल्यानंतर मशिदींमधून रमजानची अधिकृत घोषणा केली गेली. या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यासह सर्वत्र मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून बाजारपेठांमध्येही गर्दी वाढली आहे.
उपवास आणि उपासनेचा महिना
रमजान हा महिना इस्लाम धर्मातील पाच स्तंभांपैकी एक महत्त्वाचा स्तंभ मानला जातो. महिनाभर मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी ‘सहरी’ करून उपवास (रोजा) पकडतात आणि सूर्यास्तानंतर ‘इफ्तार’ करून तो सोडतात. या काळात केवळ अन्न-पाणी त्यागणे इतकेच मर्यादित नसून, वाईट विचार आणि कर्मांपासून दूर राहून ईश्वराची (अल्लाहची) प्रार्थना करण्यावर भर दिला जातो.
मशिदींमध्ये ‘तरावीह’ची लगबग
रमजान महिन्याच्या विशेष प्रार्थनेला ‘तरावीह’ म्हटले जाते. आज रात्रीपासूनच मशिदींमध्ये तरावीहच्या नमाजला सुरुवात होईल, ज्यामध्ये संपूर्ण महिनाभरात पवित्र कुरआनचे पठण केले जाते. जिल्ह्यातील सर्व मशिदींमध्ये स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून विद्युत रोषणाईने मशिदी उजळून निघाल्या आहेत.
बाजारपेठेत चैतन्य
रमजानच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खजूर, फळे, सुका मेवा, शेवया आणि अत्तर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उपवासासाठी लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थांची दुकाने सजली आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, फळबाजारात लिंबू, कलिंगड आणि इतर थंड पेयांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
बंधुभाव आणि शांततेचा संदेश
या पवित्र महिन्यात दानधर्माला (झकात आणि फितरा) अनन्यसाधारण महत्त्व आहे. गरीब आणि गरजू लोकांना मदत करून आनंदाने हा महिना साजरा केला जातो.




