बुलढाणा शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे
आ. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा उत्सव होणार भव्य; शिवप्रेमींचा निर्धार

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगामी जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी बुलढाणा येथे शिवप्रेमींच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बुलढाणा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गजेंद्र शालिग्राम दांदडे यांची ‘छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती’च्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
भव्य नियोजनावर शिक्कामोर्तब
२४ जानेवारी रोजी आयोजित या बैठकीत उत्सवाचे स्वरूप, सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराचा गौरव असलेल्या या उत्सवात यंदा नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. यावेळी समितीचे सर्व माजी अध्यक्ष, सचिव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवरायांचे विचार हीच खरी प्रेरणा – मृत्युंजय गायकवाड
याप्रसंगी बुलढाणा पालिकेचे गटनेते तथा युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. शिवजयंती म्हणजे केवळ मिरवणूक किंवा औपचारिक सोहळा नसून, महाराजांचे विचार समाजात रुजवणारा आणि सामाजिक एकोपा वाढवणारा उत्सव असावा. धर्म, जात आणि पक्षभेद बाजूला ठेवून शिवरायांच्या विचारांवर चालणारी पिढी घडवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
शिस्तबद्ध आणि उत्साही सोहळा
यंदाचा जन्मोत्सव सोहळा आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूपात साजरा केला जाणार आहे. नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र दांदडे यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.




