कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज द्या : पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​बुलढाणा: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी विनाविलंब नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने विशेष पीक कर्ज शिबिरांचे आयोजन करून कर्ज प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासन व बँकांना दिले.

​अनियमित पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना. मकरंद पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे आणि आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांना चालू हंगामासाठी नवीन कर्ज वेळेत मिळवून देण्याबाबत पालकमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी प्रशासनाला शिबिरे घेण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, लीड बँकेचे कौशेंद्रसिंह कुमार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवळे, ॲड. नाझेर काझी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​ज्या बँकेतून कर्जमाफी, त्याच बँकेतून मिळणार नवीन कर्ज

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ ज्या बँकेच्या शाखेतून मिळाला आहे, त्याच शाखेने संबंधित शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज मंजूर करावे. शेतकऱ्यांना कर्जासाठी इतर बँकांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, याची खबरदारी बँक व्यवस्थापनाने घ्यावी. शेतीची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे कोणत्याही बँकेने यात टाळाटाळ अथवा दिरंगाई करू नये, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

​९७० कोटींच्या उद्दिष्टापैकी केवळ ७८ कोटींचे वाटप

बुलढाणा जिल्ह्यातील २८२ बँक शाखांना १ लाख १६ हजार शेतकरी खात्यांसाठी ९७० कोटी रुपयांच्या खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ६ हजार ५०० खात्यांना ७८ कोटी रुपयांचेच कर्जवाटप झाले आहे. विशेषतः खाजगी बँकांनी कर्ज वाटपाचा वेग वाढवावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

​तालुकास्तरावर आयोजित होणाऱ्या या विशेष शिबिरांचा पात्र शेतकऱ्यांनी वेळेत लाभ घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पीक कर्ज मिळवावे, असे आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!