BIG BREAKING NEWS: दीड कोटींच्या बिलावर मागितली ७ टक्के लाच; ९ लाखांपैकी २ लाखांचा पहिला हप्ता घेताना पीडब्ल्यूडीचा सहाय्यक अभियंता रंगेहात एसीबीच्या जाळ्यात! सहाय्यक अभियंता बुलढाणा जिल्ह्यातील लोणारचा मूळ रहिवासी.

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
अमरावती: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे देयक काढून दिल्याच्या मोबदल्यात थेट ७ टक्के कमिशनची (लाचेची) मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) वर्ग-१ च्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. तडजोडीअंती ठरलेल्या ९ लाखांच्या रकमेपैकी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता शासकीय निवासस्थानी स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. विनोद मकरध्वज नवघरे (वय ३४, रा. विसावा कॉलनी अमरावती, मूळ रा. बोरखेडी, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार हे कुसुमकोट खुर्द (ता. धारणी) येथील कंत्राटदार असून, ते बिल्डिंग मटेरियल सप्लायर म्हणून काम करतात. त्यांनी २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षात धारणी तालुक्यातील विविध गावांमध्ये मनरेगा अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम केले असून त्यासाठी लागणारे साहित्य पुरवले होते. या कामांपैकी सुमारे दीड कोटी रुपयांचे देयक त्यांना मार्च २०२६ मध्ये मिळाले होते, तर सुमारे ८० लाख रुपयांचे देयक अद्याप येणे बाकी आहे.
मार्च २०२६ मध्ये काढून दिलेल्या दीड कोटींच्या देयकाचा मोबदला म्हणून सहाय्यक अभियंता श्रेणी-१ विनोद नवघरे याने तक्रारदाराकडे थेट ७ टक्के प्रमाणे १० लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), अमरावती येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी धारणी येथील शासकीय निवासस्थानी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत आरोपी विनोद नवघरे याने तडजोडीअंती ९ लाख रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले.
त्यानंतर रात्री ८:५३ ते ९:१६ च्या सुमारास एसीबीने शासकीय निवासस्थानी सापळा रचला. तक्रारदाराकडून पंचांसमक्ष लाचेचा पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपयांची रोकड स्वीकारताच पथकाने नवघरे याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
याप्रकरणी आरोपी विनोद नवघरे याच्याविरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याला अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक रमेश ताले, पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड, पोलीस हवा. प्रमोद रायपूरे, पोलीस नाईक वैभव जायले आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेश बहीरट यांच्या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय कामासाठी अथवा देयक मंजूर करण्यासाठी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी.




