बिनविरोध निवडीनंतर डॉ. राजेंद्र शिंगणेंनी मानले फडणवीस-शिंदेंचे आभार, पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डावलले!

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: तब्बल १६ वर्षांनंतर पार पडलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, निवडीनंतर त्यांनी दिलेल्या पहिल्याच प्रतिक्रियेने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नवा वाद पेटवला आहे. अध्यक्षपदी विराजमान होताच डॉ. शिंगणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार तर मानले; मात्र ज्या अजितदादांनी बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढले, त्यांच्याच पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मात्र डॉ. शिंगणेंनी डावलल्याने राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असताना दिवंगत अजितदादा पवार यांनी तत्परतेने ३०० कोटी रुपयांचे साहाय्य उपलब्ध करून बँक वाचवली होती. मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीत डॉ. शिंगणेंनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या संचालकांना सोबत घेण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप झाला. यावरून बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ‘स्व. अजितदादा शेतकरी परिवर्तन पॅनल’ मैदानात उतरवून शिंगणेंच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. प्रत्यक्ष प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही ३०० कोटींच्या मदतीची आठवण करून देत डॉ. शिंगणेंच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले होते.
निवडणूक जिंकण्यासाठी सर्वपक्षीय जुळवाजुळव करणाऱ्या डॉ. शिंगणेंनी अजित पवार गटाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याची चर्चा होती. अध्यक्षपदाची खुर्ची मिळताच डॉ. शिंगणेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे गोडवे गायले. संकटसमयी पाठीशी उभे राहणाऱ्या नेतृत्वाला डावलून केवळ सत्तेशी सोयीस्कर जवळीक साधण्यासाठीच डॉ. शिंगणेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव डावलल्याची चर्चा सुरू आहे.
पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी डॉ. शिंगणे हे वेळ साधून शब्द फिरवणारे नेते असल्याचा केलेला आरोप आजच्या आभार प्रदर्शनावरून सिद्ध झाल्याची चर्चा केली जात आहेत. ज्यांच्या मदतीवर जिल्हा बँक पुन्हा उभी राहिली, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी निव्वळ राजकीय हिशेब चुकता करण्याच्या डॉ. शिंगणेंच्या या पवित्र्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठा संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.




