नांदुरा येथील वृद्ध व्यक्तीची २ कोटींची ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक; बुलढाणा सायबर पोलिसांची धाडसी कारवाई, तीन आरोपी जेरबंद

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २ कोटी रुपयांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने मुंबई व ठाणे परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करून राजस्थान आणि अहिल्यानगर येथील आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

​सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी अहिल्यानगर येथून शुभम नांगल या आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई व ठाणे परिसरात पाळत ठेवून ५ लाख रुपयांचा चेक व्‍हिड्रॉ करताना धनराज उर्फ रॉबीन विष्णाराम विष्णोई (वय २१, रा. जोधपूर, राजस्थान) आणि मुनाफ शेख अनवर शेख (वय २३, रा. अहिल्यानगर) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

५२.७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त/गोठवला

पोलीस तपासादरम्यान आतापर्यंत खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त आणि खाती गोठवण्यात आली आहेत:

  • NCCRP पोर्टल: ₹३१,००,०००/- (खाते गोठवले)
  • गोल्ड लोन अकाउंट (शुभम नांगल): ₹१४,००,०००/- (खाते गोठवले)
  • रंगेहाथ जप्त रोख रक्कम (चेक विड्रॉ): ₹५,००,०००/-
  • MRM पोर्टल माध्यम: ₹१,५०,०००/-
  • अॅपल व अँड्रॉईड फोन्स: ₹१,२७,०००/- (किंमत)
  • एकूण जप्त/गोठवलेली रक्कम: ₹५२,७७,०००/-

​वृद्धाचे गेलेले २ कोटी रुपये परत मिळवण्यासाठी पोलीस पथक अहोरात्र प्रयत्न करत असून अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्याची मुख्य ‘सेंट्रल कमांड’ राजस्थानमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, ASI शकील खान, HC प्रशांत गावंडे, HC राजदीप वानखडे, HC विक्की खरात, HC राजू आडवे, PC कैलास ठोंबरे, PC राहुल इंगळे, PC क्षितीज तायडे आणि PC शुभम बोराडे यांच्या पथकाने बँकेचे तपशील, जी-मेल आयडी व मोबाईल क्रमांकाची तांत्रिक पडताळणी करून पार पाडली. आरोपींना नांदुरा न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन:

सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या डिजिटल अरेस्ट, टास्क फ्रॉड आणि शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा सायबर अपराध घडल्यास नागरिकांनी त्वरित NCCRP पोर्टलवर किंवा १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन बुलढाणा सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!