जप्ती वारंट न बजावण्यासाठी लाच मागणाऱ्या बेलीफला एसीबीने पकडले; मेहकर बसस्थानक परिसरात कारवाई

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर), मेहकर येथील बेलीफ जगदीश सुखदेव राऊत (वय ३१, रा. साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा) याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी, ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी मेहकर बसस्थानक परिसरात करण्यात आली.

५३ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध दिवाणी न्यायालय, मेहकर येथे दिवाणी दावा सुरू आहे. या दाव्यात न्यायालयाने काढलेले जंगम मालमत्ता जप्तीचे वारंट न बजावता परत करण्यासाठी बेलीफ जगदीश राऊत याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीच्या आधारे ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० ते १.०९ वाजताच्या दरम्यान मेहकर न्यायालय परिसराबाहेर लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने १५ हजार रुपयांवरून तडजोड करत १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लागलीच दुपारी २.०७ ते २.१२ वाजेच्या सुमारास मेहकर बसस्थानक परिसरात सापळा रचून तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताच आरोपी जगदीश राऊत याला ताब्यात घेण्यात आले.आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मेहकर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाणा एसीबीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (पोलीस उपअधीक्षक) भागोजी चोरमले यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार शैलेश सोनवणे, पंढरी शेळके आणि चालक नितीन शेटे यांच्या पथकाने केली.

नागरिकांना आवाहन:

कोणत्याही सरकारी कामासाठी लोकसेवक किंवा अधिकारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

टोल फ्री क्रमांक: १०६४

​बुलढाणा एसीबी संपर्क: ०७२६२-२४२५४८ / ९४०५०९१०६४

​ई-मेल: dyspacbbuldhana@mahapolice.gov.in

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!