बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड!

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत मोठी घडामोडी घडली असून, राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ सहकार नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर जिल्हा बँकेत प्रवेश करताना त्यांनी आपले पहिले खाते उघडले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ‘ब’ प्राथमिक कृषी पतसंस्था सिंदखेड राजा तालुका गटातून डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननीच्या प्रक्रियेत दत्तात्रय विनायकराव देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉ. राजेंद्र शिंगणे यांची संचालकपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

​डॉ. शिंगणे यांचे सहकार क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांची राज्याचे सहकार नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते. अखेर त्यांच्या बिनविरोध निवडीने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

उरलेल्या जागांसाठी राजकीय पेच कायम

​डॉ. शिंगणे यांची बिनविरोध निवड झाली असली, तरी उर्वरित संचालक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार की कोणती नवी वेगळी आघाडी अस्तित्वात येणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. अर्ज मागे घेण्यासाठी अद्याप बराच कालावधी शिल्लक असल्याने ‘अजून घोडे मैदान दूर आहे’ अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

निवडणुकीचा पुढील कार्यक्रम:

​१२ ऑगस्ट: अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप.

​२३ ऑगस्ट: संचालक पदांसाठी मतदान.

​२४ ऑगस्ट: मतमोजणी आणि अंतिम निकाल.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!