सात समुद्रापार घुमला विठूनामाचा गजर! ‘ग्लोबल वारी २०२६’ चे बुडापेस्टमध्ये ऐतिहासिक आणि भावूक स्वागत

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​मुंबई: महाराष्ट्राची शतकानुशतके चालत आलेली भक्ती, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक असलेली पंढरपूरची वारी आता सात समुद्रापार पोहोचली आहे. ‘ग्लोबल वारी २०२६’ (Global Vari 2026) अंतर्गत भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या पवित्र पादुकांचे प्रथमच हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे. स्लोवाकिया मार्गे डॅन्यूब (Danube) नदी ओलांडत, संध्याकाळच्या विहंगम सूर्यास्ताच्या साक्षीने या पवित्र पादुका बुडापेस्टमध्ये दाखल झाल्या, तेव्हा तेथील भारतीय समुदायाचे डोळे आनंदाश्रूंनी आणि भक्तीने दाटून आले होते.

​’लंडन ते पंढरपूर’ असा आहे जागतिक प्रवास

​६ जून २०२६ रोजी युनायटेड किंगडम (लंडन) येथून या ऐतिहासिक जागतिक दिंडीची सुरुवात झाली. त्यानंतर नेदरलँड्स, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, पोलंड आणि चेक रिपब्लिक असा प्रवास करत ही वारी २१ जून रोजी हंगेरीतील बुडापेस्ट येथे पोहचली. येथून पुढे ही यात्रा तुर्की (Turkey) आणि जॉर्जिया (Georgia) मार्गे थेट भारताकडे आणि पर्यायाने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

​’हिरोज स्क्वेअर’ ते ‘सिटी पार्क’ रंगली पालखी पदयात्रा

​बुडापेस्ट येथील ऐतिहासिक ‘हिरोज स्क्वेअर’ (Heroes’ Square) येथे या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. येथून पवित्र पादुकांसह शांततापूर्ण पालखी पदयात्रा ‘सिटी पार्क’ (City Park / Városliget) च्या दिशेने निघाली. युरोपच्या भूमीवर पारंपारिक भारतीय वेशभूषेत लहान मुलांचा सहभाग, हातातील टाळ-मृदंग आणि “राम कृष्ण हरी!”, “ज्ञानोबा माऊली तुकाराम!” अशा विठूनामाच्या जयघोषाने संपूर्ण बुडापेस्ट शहर दुमदुमून गेले.

परदेशात अनुभवली पंढरीची अनुभूती

​या सोहळ्यादरम्यान केवळ पादुका दर्शनच नाही, तर वारकरी परंपरेचे मुख्य आकर्षण असलेले भजन, प्रार्थना, भक्तीगीते आणि महाराष्ट्राचे वैभव असलेले ‘लेझीम’ नृत्यही सादर करण्यात आले. युरोपमध्ये असूनही हुबेहूब पंढरपूरच्या वारीसारखेच भक्तिमय वातावरण येथे पाहायला मिळाले.

“परदेशात राहूनही आपली संस्कृती, भक्ती आणि वारकरी परंपरा पुढे नेणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक बाब आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले, हे आमचे भाग्य!”

— विनोध धायगुडे (आयोजक, बुडापेस्टमधील भारतीय समुदाय)

​बुडापेस्टमधील स्थानिक भारतीय समुदायाने एकत्र येत या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. या अभूतपूर्व सोहळ्यामुळे जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची पताका अधिक उंच फडकावली गेली आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!