बुलढाणा जिल्ह्यात ‘कॅन्सर व्हॅन’ जनजागृती व तपासणी मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ!
१५ जुलैपर्यंत ग्रामीण व शहरी भागात होणार मोफत तपासणी; जिल्हा शल्यचिकित्सकांचे नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग (NCD) कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आजपासून ‘कॅन्सर व्हॅन जनजागृती व तपासणी मोहिमेचा’ दिमाखात शुभारंभ करण्यात आला. जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे आयोजित एका विशेष समारंभात जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मंडले, ORMO डॉ. परवीन घुंटे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा चव्हाण, दंतशल्यचिकित्सक डॉ. विष्णू सोळंकी यांच्यासह जिल्हा NCD कार्यक्रम प्रभारी डॉ. अश्विनी लहाने व डॉ. सय्यद अरशद प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कॅन्सर व्हॅनमधील सर्व वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, परिचारिका, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
-महिनाभर चालणार मोहीम; ‘या’ आजारांवर असणार विशेष लक्ष-
ही विशेष कॅन्सर व्हॅन १५ जून २०२६ ते १५ जुलै २०२६ या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध ग्रामीण आणि शहरी भागांचा दौरा करणार आहे. या मोहिमेत प्रामुख्याने खालील कर्करोगांच्या लवकर निदानासाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित केली जातील:
स्तनाचा कर्करोग (Breast Cancer)
गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer)
तोंडाचा कर्करोग (Oral Cancer)
तज्ज्ञांकडून तपासणी आणि पुढील उपचार
मोहिमेदरम्यान स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत महिलांची गर्भाशय मुख व स्तन कर्करोग तपासणी केली जाईल, तर दंतचिकित्सकांकडून तोंडाच्या कर्करोगाची सखोल तपासणी केली जाईल. तपासणीदरम्यान आढळणाऱ्या संशयित रुग्णांची विशेष नोंदणी केली जाणार असून, त्यांना पुढील उपचारांसाठी योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन केले जाईल. गावोगावी कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांना या तपासणीसाठी प्रोत्साहित करून मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
“कर्करोगाचे (कॅन्सर) जितक्या लवकर निदान होईल, तितका त्याचा उपचार अधिक प्रभावी ठरतो. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेल्या या सुविधेचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.”असे आवाहन बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी आणि कॅन्सरविरुद्धच्या लढ्यासाठी आरोग्य विभागाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मैलाचा दगड ठरणार आहे.




