खळबळजनक: जळगाव जामोद येथील त्या ‘नारकीय’ हत्येचा उकल; पित्यानेच मुलाच्या मदतीने केली पोटच्या मुलीची हत्या!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा शिवारात एका अज्ञात महिलेचा मुंडके नसलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलाच्या मदतीने पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वडील आणि भावाला अटक केली आहे.

​दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी राजूरा शिवारातील एका शेतात एका २० ते २५ वर्षीय महिलेचे मुंडके नसलेले, अर्धवट जळालेले प्रेत आढळले होते. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे शिर धडावेगळे करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी एलसीबीला तपासाचे आदेश दिले होते.

-​३०० सीसीटीव्ही आणि १००० किमीचा प्रवास-

​तपासासाठी कोणतेही भौतिक किंवा तांत्रिक पुरावे उपलब्ध नसताना, एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पंकज सपकाळे व त्यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला. पथकाने परिसरातील ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील हरवलेल्या (Missing) व्यक्तींची माहिती संकलित केली. अखेर मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार येथून बेपत्ता असलेल्या शिवानी प्रकाश भिलावेकर (वय २४, रा. खाऱ्या टेंभूर, ता. धारणी) हिची माहिती मिळाली.
​पथकांनी संशयावरून शिवानीचे वडील बापूराम नथ्थु कलमेकर (५५) आणि भाऊ अजय बापूराम कलमेकर (२७) (दोन्ही रा. खडकी, ता. खकनार, जि. बुरहानपूर) यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवानीचे तिच्या चुलत भावाशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून बापूरामने तिच्या डोक्यात बांबू मारून तिची हत्या केली. ​हत्या केल्यानंतर आरोपींनी एक दिवस मृतदेह घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी पित्याने मुलाच्या मदतीने मोटारसायकलवर मृतदेह टाकून जळगाव जामोद हद्दीतील राजूरा शिवारात आणला. ओळख पटू नये म्हणून त्यांनी तिचे मुंडके कापले आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेले कपडे आणि शस्त्रे त्यांनी जंगलात फेकून दिली होती.

-​तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी-

​ही क्लिष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, एसडीपीओ आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पंकज सपकाळे, एजाज खान, गणेश पाटील, अमोल शेजोळ, अजिस परसुवाले, राकेश नायडू, कैलास ठोंबरे आणि शिवानंद हेलगे यांनी फत्ते केली. याकामी मध्यप्रदेशातील खकनार पोलिसांनीही सहकार्य केले. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!