बुलढाणा जिल्ह्यात आगीचे तांडव; जलंबमध्ये ५० कोटींचे पाईप जळून खाक

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

जलंब: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जलंब येथे शनिवारी रात्री आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. जिगाव प्रकल्पाच्या पाईपलाईन यार्डला लागलेल्या या भीषण आगीत प्रकल्पासाठी आणलेले तब्बल ५० कोटी रुपयांचे HDPE पाईप जळून खाक झाले आहेत. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

जिगाव प्रकल्पांतर्गत सुमारे २५० किलोमीटरच्या क्षेत्रासाठी लागणारे पाईप जलंब येथील एका खुल्या यार्डमध्ये साठवून ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री या यार्डला अचानक आग लागली. हे पाईप ज्वलनशील साहित्याचे (HDPE) असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. पाहता-पाहता ही आग २०० मीटरच्या परिसरात पसरली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरून दिसत होते.

अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच खामगाव, शेगाव आणि परिसरातील इतर केंद्रांवरून सहा अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आगीची दाहकता प्रचंड असल्याने त्यावर नियंत्रण मिळवताना जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रात्रभर सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

कोट्यवधींचे नुकसान, कारण अस्पष्ट

प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत ५० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पाईप पूर्णपणे नष्ट झाले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर काही कारणाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाईप यार्डच्या जवळच शेतशिवार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. आगीच्या ज्वाळांमुळे परिसरातील तापमानात मोठी वाढ झाली होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!