विधान परिषदेसाठी ‘बुलढाणा जिल्ह्यातून दोन नेते रेस मध्ये’; नाजेर काझी की दिलीपकुमार सानंदा? कुणाची लागणार वर्णी?

अजितदादांच्या 'शब्दा'ची सरशी होणार की सानंदांच्या 'राजकीय समीकरणां'ची? जिल्ह्याचे लक्ष वेधले

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कोट्यातून विधान परिषदेवर कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या या शर्यतीत अजितदादांचे निष्ठावंत मानले जाणारे अ‍ॅड. नाजेर काझी आणि काँग्रेसमधून दिवंगत अजितदादांच्या शब्दावरून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा या दोन बड्या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.

​माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी विधान परिषदेची रणनीती आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सानंदा यांचा प्रदीर्घ अनुभव आणि सद्यस्थितीतील पक्ष बळकटीकरणासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असल्याने, त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

​दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसशी आणि अजितदादा यांच्यासोबत सुरुवातीपासून एकनिष्ठ राहिलेले माजी जिल्हाध्यक्ष तथा सध्याचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. नाजेर काझी यांचे नावही रेसमध्ये आहे. पक्ष फुटीच्या काळात आणि त्यानंतरही अजित पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी केली आहे. विशेष म्हणजे, ‘पुढची विधान परिषदेची जागा तुमची’ असा शब्द खुद्द दिवंगत अजित पवार यांनी काझी यांना दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे दादांनी दिलेला शब्द पाळल्या जाणार का, याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत.

​एका बाजूला पक्षातील जुने-जाणते आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नाजेर काझी यांची ओळख आहे, तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील राजकीय ताकद आणि समीकरणे जुळवून आणण्याची क्षमता सानंदा यांच्याकडे आहे. या दोघांपैकी नेमकी कुणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!