बुलढाणा येथे ४ एप्रिल रोजी कुरेशी समाजाचे चौथे राष्ट्रीय संमेलन
राज्यातील सर्व कुरेशी बांधवांनी या राष्ट्रीय संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,आयोजक जाकीर हुसेन कुरेशी यांचे आवाहन

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: कुरेशी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी कार्यरत असलेल्या ‘राष्ट्रीय कुरेश कॉन्फरन्स’च्या वतीने चौथ्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे महत्त्वपूर्ण संमेलन येत्या ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी भवन, मलकापूर रोड, बुलढाणा येथे पार पडणार आहे.
या संमेलनाचे मुख्य आकर्षण राष्ट्रीय कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सनोबर अली कुरेशी (दिल्ली) हे असून, ते समाजाला मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन राष्ट्रीय कुरेश कॉन्फरन्सचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा बुलढाणा नगर परिषदेचे नगरसेवक जाकीर हुसेन कुरेशी यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
या संमेलनात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतील कुरेशी समाजातील मान्यवर, समाजसेवक, विचारवंत आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समाजातील शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय मागासलेपण दूर करून प्रगतीची नवी दिशा निश्चित करणे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
कुरेशी समाजाला संघटित करून विकासासाठी ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. तरी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील सर्व कुरेशी बांधवांनी या राष्ट्रीय संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक जाकीर हुसेन कुरेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.




