कार्यकर्त्यांसाठी ३५ कोटींच्या कामाचे ‘कमिशन’ सोडले; आ.संजय गायकवाडांचे विधान; विधानाने राजकीय भूकंप!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

चिखली: बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एका विधानाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. ते विधान केलेय बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील उदयनगर येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी “सुमारे ३५ कोटी रुपयांचे कार्यकर्त्यांसाठी कमिशन सोडले” असे खळबळजनक वक्तव्य केले. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, महायुतीमधील अंतर्गत कलहही चव्हाट्यावर आला आहे.

​उदयनगर येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कामाची पद्धत सांगताना म्हटले की, “सुमारे ३५ कोटी रुपयांचे कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी सोडले आहे. पूर्वी सायकलवर फिरणारे माझे कार्यकर्ते आज सक्षम झाले आहेत. कार्यकर्ता मजबूत असेल तरच नेता मजबूत राहतो. मी महाराष्ट्रातील दमदार आमदारांपैकी एक आहे.” ​आमदारांच्या या विधानामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, त्यांनी ही “कमिशनखोरीची कबुली” असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपा आमदारावर नाव न घेता निशाणा?

​याच भाषणादरम्यान आमदार गायकवाड यांनी चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली मतदार संघात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामधील छुपी दरी आता उघडपणे समोर आली आहे. महायुतीमधील हा ‘फ्रेंडली फाईट’चा इशारा आहे की अंतर्गत बंडाळी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सत्ताधारी आमदारानेच मंचावरून ‘कमिशन’चा उल्लेख केल्याने राज्यभर चर्चांना उधाण आले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!