बुलढाण्यात ईद-उल-फित्रचा अभूतपूर्व उत्साह; हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाहवर अदा केली सामूहिक नमाज
देशासह जगभरात शांतता आणि अमन प्रस्थापित होण्यासाठी अल्लाहकडे "दुआ"

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: पवित्र रमजान महिन्याच्या सांगतेनंतर आज, शनिवार २१ मार्च रोजी बुलढाणा शहरासह जिल्ह्यात ईद-उल-फित्र हा सण अत्यंत उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. शहरातील ऐतिहासिक जुनागाव ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
आज सकाळी ईदच्या नमाजसाठी मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सकाळी शहरातील इकबाल चौक येथील जामा मस्जिद येथून पारंपरिक पद्धतीने भव्य जुलूस काढण्यात आला. हा जुलूस शहरातील मुख्य मार्गावरून जुनागाव येथील ईदगाह मैदानावर पोहोचला. सकाळी ठीक ९:३० वाजता हजारो बांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने ईद-उल-फित्रची सामूहिक नमाज अदा केली.

देशासाठी मागितली ‘अमन-शांती’ची दुआ
नमाज पठणानंतर विशेष खुतबा (प्रवचन) झाले, ज्यामध्ये ईदचे महत्त्व सांगण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी हात उंचावून अल्लाहकडे विशेष दुआ मागितली. “देशासह संपूर्ण जगात शांतता, बंधुभाव आणि अमन प्रस्थापित व्हावा, सर्वांचे जीवन सुख-समृद्धीने भरून जावे,” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. दुआ संपताच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत ‘ईद मुबारक’ म्हटले.
चोख पोलीस बंदोबस्त
ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी बुलढाणा पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ईदगाह परिसर आणि मुख्य मार्गांवर कडक पोलीस पहारा होता, ज्यामुळे सर्व धार्मिक विधी शांततेत पार पडले.




