चिखलीच्या जयस्तंभ चौकात भीषण आग; १० ते १५ दुकाने जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान ​बोंद्रे पेट्रोल पंपाजवळ थरार; सुदैवाने जीवितहानी टळली

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

चिखली: शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौक परिसरात आज भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील सुमारे १० ते १५ लहान-मोठी दुकाने जळून खाक झाली असून, यामध्ये व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयस्तंभ चौकातील बैलगाडी बागवानांच्या फळांच्या दुकानांना प्रथम आग लागली. वाऱ्याचा वेग आणि आगीचे भीषण स्वरूप पाहता, काही क्षणांतच या आगीने शेजारील घड्याळाचे दुकान आणि इतर लहान व्यावसायिकांच्या गाळ्यांना आपल्या कचाट्यात घेतले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग इतकी भीषण होती की पाच ते सहा दुकाने पूर्णपणे जळून कोळसा झाली आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

ज्या ठिकाणी ही आग लागली, तिथून अवघ्या २०० मीटर अंतरावर ‘बोंद्रे पेट्रोल पंप’ आहे. सुदैवाने आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने पेट्रोल पंपापर्यंत झळा पोहोचल्या नाहीत, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता, अशी चर्चा घटनास्थळी नागरिक करत होते. आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही कारणाने, याचा तपास सध्या पोलीस आणि प्रशासन करत आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!