दाताळा येथे डीपी दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू; ​प्रशिक्षण नसतानाही शुभंमला डीपीवर चढवले कोणी? शुभंमच्या मृत्यूला जबाबदार कोण?

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

मलकापूर: तालुक्यातील दाताळा येथे ट्रान्सफॉर्मर (डीपी) दुरुस्तीचे काम करत असताना डीपीवरील वीजपुरवठा सुरू असलेल्या मेनलाईन तारेला स्पर्श झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. मात्र, या घटनेत आता एक धक्कादायक माहिती समोर आली असून, मृत युवक महावितरणमध्ये अधिकृतपणे नियुक्त नसतानाही त्याला डीपीवर चढवण्यात आल्याने महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाताळा गावातील पिंप्री गवळी फाट्यावरील एक डीपी नादुरुस्त होती. या डीपीची दुरुस्ती करण्यासाठी शुभंम रामकृष्ण वानखेडे (वय २४, रा. वाडी, ता. नांदुरा) याला बोलावण्यात आले होते. शुभम डीपीवर चढून काम करत असतानाच डीपीवरील वीजपुरवठा (Current) सुरू असलेल्या मेनलाईन तारेला स्पर्श झाल्याने त्याला. विजेचा जोरदार धक्का लागल्याने शुभम डीपीवरून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. उपस्थित नागरिकांनी तातडीने त्याला मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

प्रशिक्षण नाही, नियुक्ती नाही; मग तो डीपीवर चढलाच कसा?

या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, मृत शुभंम वानखेडे हा महावितरणचा कर्मचारी नव्हता, की तो ‘आउटसोर्सिंग’ (कंत्राटी) यंत्रणेतही नियुक्त नव्हता. तरीही दाताळा विभागातील काही विद्युत अधिकाऱ्यांनी त्याला वैयक्तिक स्तरावर काम करण्यासाठी बोलावले होते, अशी चर्चा आहे. ज्या तरुणाला तांत्रिक प्रशिक्षण नाही, त्याला जीवघेण्या कामासाठी डीपीवर चढवण्याची परवानगी कुणी दिली? असा संतप्त सवाल आता विचारले जात आहेत.

रुग्णालयात गर्दी आणि रोष

शुभंमच्या मृत्यूची बातमी समजताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, ॲड. हरीश रावळ, पत्रकार विलास खर्चे, ॲड. दिलीप बगाडे यांच्यासह नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

पोलिस तपास सुरू

मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश महल्ले, हेडकॉन्स्टेबल बाळू टाकरखेडे व कॉन्स्टेबल सचिन दासर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. महावितरणच्या ज्या अधिकाऱ्यांनी शुभमला कामावर बोलावले होते, त्यांची चौकशी पोलिस करणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ऐन तारुण्यात एका होतकरू मुलाचा बळी गेल्याने  परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!