’आयुष’ विभागच व्हेंटिलेटरवर; राष्ट्रपतींनीच आता लक्ष द्यावे!काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात;
बुलढाण्यातील ७० रुग्णालयांची अवस्था बिकट

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: एकीकडे शेगाव येथे राष्ट्रपतींच्या हस्ते भव्य ‘राष्ट्रीय आरोग्य मेळाव्या’चे उद्घाटन होत असताना, दुसरीकडे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. “बुलढाणा जिल्ह्यातील ७० आयुष रुग्णालये आज व्हेंटिलेटरवर असून, हा विभाग स्वतःच आजारी पडला आहे,” असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राष्ट्रपतींनी या वास्तवाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
इमारती उभ्या, पण सुविधा शून्य!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारच्या ‘आरंभशूर’ धोरणावर टीका करताना सांगितले की, जिल्ह्यात ७० आयुष रुग्णालये सुरू झाली, इमारतीही पूर्ण झाल्या. मात्र, तिथे पुरेसा निधी नाही, कर्मचारी नाहीत आणि औषधांचाही पत्ता नाही. हीच अवस्था संपूर्ण महाराष्ट्राची असून, प्रशासनाने केवळ घोषणांचा पाऊस पाडला आहे, मात्र प्रत्यक्ष योजना पूर्णत्वास गेलेल्या नाहीत.
’टक्कल व्हायरस’ आणि रेशन रॅकेटचा मुद्दा तापला
राष्ट्रपती ज्या तालुक्यात येत आहेत, तिथेच दूषित रेशन खाल्याने नागरिकांचे केस आणि नखे गळण्याचे प्रकार घडले होते. या गंभीर प्रकरणावर भाष्य करताना सपकाळ म्हणाले, “एक वर्ष उलटले तरी या केस गळतीचे नेमके कारण समोर आलेले नाही. यामागे एक मोठे रॅकेट कार्यरत असून प्रशासकीय दबावापोटी अहवाल दाबला जात आहे. प्रशासनाचे ‘टक्कल’ उघडे पडले असतानाही आयुष विभाग गप्प बसून आहे, हे दुर्दैव आहे.”
भ्रष्टाचाराचा विळखा आणि कुपोषण
जिल्ह्यातील अन्य समस्यांवर बोट ठेवताना त्यांनी खालील मुद्दे मांडले:
जलजीवन मिशन: या योजनेत मोठे रॅकेट सक्रिय असून महाराष्ट्रात गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यात झालेल्या लुटीची चौकशी व्हावी.
कुपोषण: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना प्रशासन त्यावर पडदा टाकण्याचे काम करत आहे.
अपेक्षा: राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे या ७० रुग्णालयांना नवसंजीवनी मिळेल, केस गळती प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल आणि शाबाह्य मुलांच्या प्रश्नावर ठोस निर्देश दिले जातील, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली.
“केवळ मेळावे भरवून आरोग्य सुधारणार नाही, तर कागदावरच्या योजना प्रत्यक्ष जमिनीवर राबवल्या पाहिजेत. राष्ट्रपतींनी या दौऱ्यात प्रशासनाला कडक निर्देश द्यावेत.”
— हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.




