लग्नाचं आमिष दाखवून विश्वासघात; महावितरणच्या कर्मचाऱ्यामुळे तरुणीची आत्महत्या

चिखली तालुक्यातील केळवद येथील घटना; आई-वडील शेतात असताना संपवली जीवनयात्रा

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

चिखली: दोन वर्षांपासून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, सतत संपर्कात राहण्यासाठी मोबाईल घेऊन दिला आणि लग्नाचे खोटे स्वप्न दाखवून अखेर विश्वासघात केला. या धक्क्यातून चिखली तालुक्यातील केळवद येथील एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रूपाली रामदास सरकटे असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे महावितरण कंपनीत विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत असलेला तन्मय विजय गवई (रा. पाटोदा, ता. चिखली) याचे रूपालीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तन्मयने रूपालीला लग्नाचे आमिष दाखवले होते. “आपण उन्हाळ्यात लग्न करू” असे आश्वासन देऊन त्याने तिचा विश्वास संपादन केला होता. मात्र, काही काळापासून त्यांच्यात लग्नावरून वाद होऊ लागले होते.

शेवटचा फोन ठरला अखेरचा...

२४ जानेवारी रोजी सकाळी रूपालीचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेतात कामाला गेले होते, तर भाऊ कामाच्या निमित्ताने बुलढाण्याला गेला होता. घरात कुणीही नसताना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रूपालीचे तन्मयसोबत फोनवर बोलणे झाले. याच फोनवरून झालेल्या चर्चेनंतर रूपालीने टोकाचे पाऊल उचलले. तिने घराचा दरवाजा आतून बंद करून खिडकीच्या पाईपला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.

आई-वडिलांचा हृदयद्रावक हंबरड

घराचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती रूपालीच्या वडिलांना समजताच त्यांनी शेतातून घराकडे धाव घेतली. पुढचा दरवाजा बंद असल्याने मागील बाजूने घरात प्रवेश केला असता, समोर पोटच्या गोळ्याला लटकलेल्या अवस्थेत पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. या हृदयद्रावक दृश्याने संपूर्ण गाव हेलावून गेले आहे.

दोषीवर कठोर कारवाईची मागणी

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तन्मय गवई यानेच रूपालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “आधी प्रेमाचे नाटक करून मोबाईल दिला, स्वप्न दाखवली आणि नंतर फसवणूक केली,” असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून, संशयित आरोपीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!