अमरावती शिक्षक मतदारसंघात बुलढाण्याच्या भूमिपुत्रांमध्येच थेट ‘सामना’; देवकर विरुद्ध लहाने लढतीने चुरस वाढली!

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

​बुलढाणा: अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रचाराचा ज्वर चांगलाच वाढला असून, यंदाची लढत पारंपरिक समीकरणांना सुरुंग लावणारी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार दत्तात्रय (डी. एस.) लहाने यांच्यात थेट आणि अटीतटीचा संघर्ष रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रमुख उमेदवार बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने स्थानिक अस्मितेसोबतच संपूर्ण विभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी शिक्षकांच्या मूळ आणि प्रलंबित प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले नाही, अशी उघड नाराजी शिक्षक वर्गात पसरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वेतनाचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना, अनुदानाचे रखडलेले टप्पे आणि शिक्षकांच्या दैनंदिन अडचणींवर ठोस तोडगा न निघाल्याने मतदारांमध्ये असंतोष खदखदत आहे. यंदाच्या निवडणुकीत पक्षीय निष्ठांपेक्षा शिक्षकांच्या हक्कांचे आणि प्रश्नांचे मुद्दे अधिक प्रभावी ठरताना दिसत असल्याने प्रस्थापितांना मोठा राजकीय फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

​निवडणूकीच्या निकालात बुलढाणा ठरणार ‘गेमचेंजर’

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची संख्या लक्षणीय असली, तरी दोन्ही प्रमुख उमेदवार बुलढाण्याचे असल्याने या जिल्ह्यातील मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत. आपापल्या संपर्क यंत्रणेच्या बळावर दोन्ही उमेदवारांनी पाचही जिल्ह्यांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिक्षक संघटनांची भूमिका आणि स्थानिक पातळीवरील समीकरणांची जुळवाजुळव यामुळे लढत शेवटच्या क्षणापर्यंत अनपेक्षित वळणावर पोहोचली आहे.

अलिकडेच पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, अमरावती शिक्षक मतदारसंघातही प्रस्थापितांविरोधात मतदारांचा रोष मतपेटीतून व्यक्त होईल का, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. एका बाजूला प्रस्थापित यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारा उमेदवार,  शेवटी शिक्षक मतदार कोणाच्या पारड्यात आपले निर्णायक मत टाकतात, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!