BREAKING NEWS: लाकूड वाहतूक परवान्यासाठी २ हजारांची लाच मागणाऱ्या बुलढाणा वन सर्व्हेक्षकाला अटक

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: लाकूड वाहतुकीचा परवाना (ट्रान्झिट पास) देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयातील वन सर्व्हेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अनिल जयदेव वाघ (वय ५३ वर्ष, रा. अंबिकानगर, सागवन, ता. जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.
तक्रारदार (वय ४० वर्ष) हे सुतारकाम करतात. त्यांनी दोन शेतकऱ्यांकडून सागवान झाडे विकत घेतली होती. वन विभागाच्या परवानगीने तोडलेल्या या लाकडाची वाहतूक करण्यासाठी ‘ट्रान्झिट पास’ (Transit Pass) मिळवण्याकरिता संबंधित शेतकऱ्यांमार्फत वन विभाग, जळगाव जामोद येथे अर्ज करण्यात आला होता. पुढील कार्यवाहीसाठी हा अर्ज उपवनसंरक्षक कार्यालय, बुलढाणा येथे पाठवण्यात आला होता.
कामाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार उपवनसंरक्षक कार्यालयात गेले असता, तेथील वन सर्व्हेक्षक अनिल वाघ यांनी लाकूड वाहतूक परवान्याचे काम करून देण्यासाठी लोकसेवक श्री. गाडवे यांच्या नावाने स्वतःकरिता २,००० रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी तक्रारदाराने ०९ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), बुलढाणा येथे रीतसर तक्रार दाखल केली.
एसीबीच्या पथकाने ०९ जुलै २०२६ आणि १६ जुलै २०२६ रोजी उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यात आरोपी अनिल वाघ यांनी श्री. गाडवे यांच्या नावाने स्वतःसाठी २ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर १६ जुलै रोजी उपवनसंरक्षक कार्यालयात सापळा कारवाई आयोजित करण्यात आली होती; मात्र तक्रारदारावर संशय आल्याने आरोपी वाघ यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरीही लाचेची मागणी सिद्ध झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अप.क्र. ९१८/२०२४, कलम ७) गुन्हा दाखल करण्यात आला असून, १७ सप्टेंबर रोजी दुपारी १:५९ वाजता त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोहेकॉ प्रवीण बैरागी, अमोल झिने, दीपक जाधव, जगदीश पवार, पोकॉ शैलेश सोनवणे, पंढरी शेळके, रणजित व्यवहारे, रतन गिरी, प्रफुल आमले, चापोहेकॉ नितीन शेटे व चालक पोकॉ अर्शद शेख यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




