BIG BREAKING: बुलढाण्यात बॅनरबाजीवरून राजकीय ठिणगी; विद्याधर महाले यांच्या फलकावरून राडा, शिवसैनिकावर गुन्हा दाखल

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: शहरातील जयस्तंभ चौक परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव तथा चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाचे फलक लावण्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. या प्रकरणी शिवसैनिक विक्की आव्हाड यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंदार भास्कर बाहेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कार्यकर्ते गांधी भवन परिसरात विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फलक लावत होते. त्यावेळी एमएच-२८ एझेड-०४८६ क्रमांकाच्या कारमधून विक्की आव्हाड व त्यांचे साथीदार घटनास्थळी धडकले. त्यांनी फलक लावण्यास तीव्र विरोध दर्शवत कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ केली. “इथे फलक लावले तर एकेकाला कापतो आणि जीवे मारतो,” अशी थेट धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत जुनागाव-भिलवाडा परिसरातील रहिवासी तथा शिवसैनिक विक्की आव्हाड आणि इतर सात ते आठ अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १८९, २९६ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. धमकी देणाऱ्या इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.
‘बॅनर वॉर’मागे अंतर्गत राजकीय ईर्ष्या?
काही दिवसांपूर्वीच १५ ऑगस्ट रोजी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस चिखली येथे मोठ्या शक्तिप्रदर्शनाने साजरा करण्यात आला होता. त्यानंतर चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस बुलढाणा शहरात साजरा करण्याचा निर्णय भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. चिखलीच्या नेत्यांचे फलक बुलढाण्यात लागताच गायकवाड समर्थकांकडून विरोध झाल्याचे बोलले जात असून, या वादाला जुन्या राजकीय कुरघोडीची पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. बुलढाणा शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




