बुलडाणा वन विभागात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा; उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलडाणा: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुलडाणा वन विभागाच्या वतीने उप वनसंरक्षक कार्यालय (राणी बगीचा) येथे ध्वजारोहण व गुणवंत कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. बुलडाणा वन विभागाचे उप वनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी वर्षभरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना उप वनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्कारांमध्ये वनपाल: ०४,वनरक्षक: १४,लेखापाल: ०१,लिपिक: ०१,वन सर्वेअर: ०१,सर्पमित्र, मानद वन्यजीव रक्षक (बुलडाणा) आणि वनमजूर यांचा समावेश होता.
या उत्कृष्ट कार्याची दखल:
सन्मानित कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही बजावलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल या वेळी घेण्यात आली, ज्यामध्ये प्रामुख्याने वनसंरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन, वन्यजीव रेस्क्यू व मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्याचे प्रयत्न,रोपवाटिका/रोपवन आणि निसर्गपर्यटन विकास,वनगुन्ह्यांचा जलद तपास व निपटारा,जल व मृदा संधारण आणि वनवणवा नियंत्रण,उत्कृष्ट कार्यालयीन कामकाज अशा प्रकारच्या प्रोत्साहनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वनसंवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या कार्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास वन विभागातील क्षेत्रीय अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पर्यावरण रक्षण व वन्यजीव संवर्धनासाठी आपली बांधिलकी पुनरुच्चारित केली.




