BREAKING NEWS: सुंदरखेडमध्ये आरोग्य उपसंचालकांच्या पथकाचा छापा; डॉ. गवई पुन्हा ताब्यात; अवैध गर्भपात औषधी आणि टॅब जप्त; डमी रुग्णाच्या मदतीने बनाव उघडकीस

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: शहरानजीक असलेल्या सुंदरखेड येथील तार कॉलनीमध्ये आरोग्य उपसंचालक अकोला यांच्या विशेष पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणी डॉ. गवई यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान पथकाने घटनास्थळावरून अवैध गर्भपाताची औषधे तसेच गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे टॅब जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरखेड परिसरामध्ये अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान केले जात असल्याच्या तक्रारी अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे डॉ. धनंजय चिमणकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुंदरखेडच्या तार कॉलनी येथील डॉ. गवई यांच्या घरावर छापा मारण्याची योजना आखली.
पथकाने एका डमी (बनावट) रुग्णाला डॉ. गवई यांच्या घरी पाठवले. डमी रुग्णाची चौकशी करून डॉ. गवई यांनी त्या महिलेचे अवैध गर्भलिंग निदान केले. लिंग निदान झाल्याची खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पथकाने तात्काळ घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान अवैध गर्भपातासाठी लागणारी औषधे आणि टॅब हस्तगत करण्यात आले.
विशेष म्हणजे, यापूर्वीही अवैध गर्भपात व गर्भलिंग निदान केल्याच्या तक्रारीवरून ११ जून २०२५ रोजी बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या पथकाने तार कॉलनीमधीलच डॉ. गवई यांच्या दुसऱ्या घरावर छापा टाकून कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याचे या ताज्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
अकोला आरोग्य उपसंचालकांच्या या संयुक्त कारवाईत डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. विशाल येदवर, ॲड. शुभांगी ठाकरे, श्रीमती किरण जणुंकर यांच्यासह बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
याप्रकरणी डॉ. गवई यांना ताब्यात घेण्यात आले असून, बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.




