पैगंबर मोहम्मद साहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; नाझिया इलाही खानवर गुन्हा नोंदवण्याची बुलडाण्यातील मुस्लिम बांधवांची मागणी

बुलडाणा: युट्युबवर एका व्हिडिओद्वारे इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल अत्यंत हिन पातळीवर टीका करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील नाझिया इलाही खान हिच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने लेखी तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
पोलीस ठाणेदारांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, काही गुंड प्रवृत्तीचे लोक समाजात सातत्याने तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. सध्या युट्युबवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यामध्ये पश्चिम बंगालमधील रहिवासी नाझिया इलाही खान (वय ३७ वर्ष) ही महिला पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल अत्यंत अपमानजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. या वक्तव्यामुळे देशातील शांतताप्रिय वातावरण खराब करण्याचा आणि दंगल घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
’तर तीव्र आंदोलन छेडणार’
“मुस्लिम समाज पैगंबर मोहम्मद साहेब यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. त्यांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला आहे. परंतु, वारंवार अशा शांततादूतांवर अपमानकारक टिप्पणी केली जाते आणि दोषींवर कोणतीही कडक कारवाई होत नाही. उलटपक्षी, त्याची सर्व जबाबदारी मुस्लिम समाजावरच ढकलली जाते, ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे,” अशी खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून संशयित महिला नाझिया इलाही खान हिच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून तिला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास मुस्लिम समाज न्यायासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही तक्रार अर्जाद्वारे देण्यात आला आहे.
या तक्रारीवर बबलू कुरेशी, मोहम्मद दानिश, इशू आझाद, सय्यद अहफाज, शेख जुनेद यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




