महावितरणच्या ‘अजब’ कारभारामुळे शेतकरी संतप्त; आसलगाव शिवारात सकाळी वीज देण्याची ‘किसान एकता महासंघ’ची मागणी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: सध्या संपूर्ण विदर्भासह बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशांच्या पार गेला असून, प्रशासनाने दुपारी १२ ते ४ या वेळेत तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाही महावितरण कंपनीने जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ए.जी. शेत शिवारातील कृषी पंपांचा वीज पुरवठा जाणीवपूर्वक सकाळी ११:२५ ते दुपारी ५:२५ या अत्यंत कडक उन्हाच्या वेळेत ठेवला आहे. महावितरणच्या या अजब निर्णयामुळे पिकांचे नुकसान तर होत आहेच, शिवाय शेतकऱ्यांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. याविरुद्ध शेतकरी आक्रमक झाले असून ‘किसान एकता महासंघ’च्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन वीज पुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
आसलगाव शिवारातील वीज पुरवठा सकाळी ६:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्याच्या दुपारच्या वेळेत शेता पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कष्टाचे आणि जीविताला घातक ठरत आहे. महावितरणने ११:२५ ते ०५:२५ पर्यंत विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचा हा निर्णय घेतला आहे.म्हणून अजब निर्णय तातडीने मागे घेऊन जुन्या वेळापत्रकानुसार सकाळीच वीज पुरवठा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशारा
शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांवर येत्या दोन दिवसांत महावितरणने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, आसलगाव शिवारातील समस्त शेतकरी बांधव तीव्र उपोषणाला बसतील, असा इशारा किसान एकता महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी देवेंद्र सिंह सोंबणशी व शेतकरी बांधवांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी (जळगाव जामोद), तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, पोलीस निरीक्षक (जळगाव जामोद) आणि महावितरणचे मलकापूर उपविभागीय अधिकारी यांनाही माहिती व योग्य त्या कारवाईसाठी सादर करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी रामेश्वर शामराव निर्मल, एकनाथ गायकी,संतोष कारोडे, मोहन पडघान यांच्यासह किसान एकता महासंघाचे पदाधिकारी आणि आसलगाव शिवारातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




