बुलडाण्यात वनविभागाची मोठी कारवाई; अवैध उत्खनन प्रकरणी २ ट्रॅक्टरसह जेसीबी जप्त, ३ आरोपींना अटक

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गौणखनिज माफियांनी आता थेट वन जमिनीलाच आपले लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बुलडाणा वनविभागाने अशाच एका टोळीवर मोठी कारवाई करत धाडसी पाऊल उचलले आहे. भादोला वन बिटमधून मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी वनविभागाने २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबी जप्त केला असून, ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे वन जमिनीतून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
बुलडाणा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भादोला बिटमधील कक्ष क्र. ५२३ मध्ये मुरुमाचे अवैध उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती बुलडाणा वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीएफओ (DFO) जमीर शेख यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. एसीएफ (ACF) वैभव काकडे आणि आरएफओ (RFO) सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन सखोल शोध घेतला.
या तपासात धक्कादायक बाब समोर आली. परिसरातील एका नवीन बांधलेल्या रोडचे साईट पट्टे भरण्यासाठी थेट वन जमिनीतूनच अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून तो वाहतूक केला जात होता.
१९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
वनविभागाने या प्रकरणी तात्काळ सूत्रे हलवून आरोपींचा शोध घेतला आणि तीन जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
महेश भीमराव जाधव (वय ४० वर्षे, रा. भादोला)
योगेश वसंतराव एकडे (वय ४१ वर्षे, रा. भादोला)
विजय रामा इटकर (वय ३१ वर्षे, रा. पिंपरखेड)
या आरोपींकडून वन गुन्ह्यात वापरण्यात आलेले २ ट्रॅक्टर ट्रॅली आणि १ जेसीबी असा एकूण १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक नितेश गवई, समाधान झोटे, गजानन शिंदे, गजानन पोटे, विक्रम राऊत, बाळासाहेब घुले तसेच वनमजूर रवींद्र तायडे, दीपक सोनुने, पवन मुळे, अमोल चव्हाण आणि प्रवीण सोनवणे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल प्रदीप मुंढे करत आहेत. वनविभागाच्या या कडक भूमिकेमुळे परिसरात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




