बुलढाणा शहर पोलिसांचा शानदार रूट मार्च; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाऊल

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: उद्या २८ मे रोजी होऊ घातलेल्या इदुल जोहा (बकरी ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांततेचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी बुलढाणा शहर पोलिसांच्या वतीने शहराच्या मुख्य मार्गावरून एक भव्य रूट मार्च काढण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा रूट मार्च अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
हा रूट मार्च बुलढाणा शहर पोलीस ठाण्यापासून सुरू झाला. तिथून पुढे बाजार लाईन,जनता चौक,सराफा बाजार,तेलगू नगर,टिपू सुलतान चौक,डोंगरे चौक,इकबाल चौक,कोडवाळा परिसर,जिल्हा परिषदेचे बांधकाम कार्यालयया मुख्य मार्गांवरून फिरत, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करत अखेर हा रूट मार्च पुन्हा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात येऊन समाप्त झाला.
या रूट मार्चमध्ये कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने सुरक्षा दलांचे जवान आणि अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा शहर पोलीस ०६ अधिकारी,५० पोलीस कर्मचारी,३५ आरसीबी (RCB) जवान,२१ एसआरपी (SRP) जवान,५० होमगार्ड कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
-शांततेचे आवाहन!
रूट मार्च दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना आणि समाजबांधवांना आगामी बकरी ईदचा सण अत्यंत उत्साहात, गुण्यागोविंदाने आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. शहरात कुठेही शांतता भंग होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




