कौटुंबिक वादातून पोटच्या चार मुलांना विहिरीत फेकून बापाची आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलडाणा: कौटुंबिक वादातून एका पित्याने आपल्या चार चिमुरड्यांना विहिरीत फेकून त्यांची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही त्याच विहिरीत उडी घेऊन जीवनप्रवास संपवला. जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावात रविवारी रात्री घडलेल्या या थरारक आणि अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, भाले अंजन येथील रहिवासी विजय मुसा किराडिया याचे गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसोबत सतत वाद होत होते. या घरगुती भांडणामुळे त्रस्त होऊन त्याने काही दिवसांपूर्वीच पत्नीला तिच्या माहेरी सोडून दिले होते. रविवारी सकाळी विजय घरातील कामे करत असताना, त्याच्या काही नातेवाईकांनी त्याला “तू स्वतः का काम करतोस, तुझी बायको कुठे गेली?” अशी विचारणा केली. आधीच मानसिक तणावात असलेल्या विजयला या प्रश्नामुळे अधिकच नैराश्य आले आणि तो प्रचंड त्रस्त झाला.
​नातेवाईकांच्या विचारणेनंतर मानसिक संतुलन बिघडलेल्या विजयने एक अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. रविवारी दुपारच्या सुमारास तो आपल्या चारही मुलांना सोबत घेऊन गावातील धरण परिसरात गेला. तेथे असलेल्या एका विहिरीपाशी नेऊन त्याने आपली चार निष्पाप मुले—​प्रित किराडिया, ​प्राची किराडिया, ​पूर्वी किराडिया,​पियुष किराडिया
​यांना एकापाठोपाठ एक विहिरीत फेकून दिले. मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पाहून, थोड्याच वेळात विजयनेही त्याच विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली.

-​पोलीस प्रशासनाची धाव, मृतदेह बाहेर काढले-

​घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पंचनामा केल्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा क्रूर अंत झाल्याची वार्ता पसरताच भाले अंजन गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. निष्पाप चिमुरड्यांचा काय दोष होता, असा संतप्त आणि आर्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या सामूहिक हत्याकांड आणि आत्महत्येप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील इतर कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!