डायल ११२ चा प्रभावी वापर: बुलढाणा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे माळविहीर शिवारातील बालविवाह रोखण्यात यश!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: शासनाने बालविवाहाविरुद्ध कडक कायदे करूनही छुप्या मार्गाने बालविवाह लावण्याचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात समोर आला असून, एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह बुलढाणा शहर पोलिसांनी चाईल्ड हेल्प लाईनच्या मदतीने वेळीच रोखला आहे. ‘डायल ११२’ वर मिळालेल्या एका गोपनीय माहितीमुळे हा बालविवाह रोखण्यात पोलिसांना मोठे यश आले.

​मिळालेल्या माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास बुलढाणा शहर पोलिसांना ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर एक महत्त्वाची माहिती मिळाली. खामगाव रोडवरील ग्राम माळविहीर शिवार येथील संतनगरी परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह १५ मे २०२६ रोजी लावला जाणार असल्याची ती माहिती होती.दरम्यान, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथील चाईल्ड हेल्प लाईनने देखील या बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडे तातडीची मदत मागितली. घटनेचे गांभीर्य ओळखून बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी चाईल्ड हेल्प लाईनच्या कर्मचाऱ्यांसह तातडीने संतनगरी परिसरातील विवाहस्थळी धाव घेतली.व मिळालेल्या माहितीची खात्री केली. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून हा बालविवाह कायदेशीररित्या रोखण्यात आला. याप्रकरणी प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

​सदरची कौतुकास्पद कामगिरी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, महिला पोलीस हवादार अनिता आराख (ब.नं. १९३५), पोलीस नाईक सतिष पवार (ब.नं. २४५) आणि पोलीस कॉन्स्टेबल विकास सुरडकर (ब.नं. २६०८) यांनी चाईल्ड हेल्प लाईनच्या कर्मचाऱ्यांसह ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असून, नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे. तसेच, संकटसमयी ‘डायल ११२’ हा क्रमांक कसा वरदान ठरू शकतो, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!