रील्स बनवण्याच्या नादात दीड वर्षाच्या चिमुकल्याचा बळी; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

मेहकरजवळ धावती लक्झरी बस उलटली; २५ प्रवासी जखमी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

मेहकर: समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडला असून, चालक आणि वाहकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. धावत्या बसमध्ये ‘रील्स’ बनवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि लक्झरी बस उलटली. या भीषण अपघातात दीड वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही खळबळजनक घटना रविवार, १९ एप्रिल रोजी पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास फर्दापूर टोल नाक्याजवळ घडली.

​मुंबईहून पुसदच्या दिशेने निघालेली ‘एमएच २९ बीई ३२३३’ क्रमांकाची लक्झरी बस समृद्धी महामार्गावरून सुसाट धावत होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान बसचा चालक आणि वाहक मोबाईलवर ‘रील्स’ बनवण्यात दंग होते. त्यांचे लक्ष विचलित झाल्याने फर्दापूर टोल नाक्याजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस महामार्गावरच पलटी झाली.

चिमुकल्याचा जागीच मृत्यू

​या अपघातात पियुष यशपाल राठोड (वय दीड वर्ष) या चिमुकल्याचा बसखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. आई-वडिलांच्या डोळ्यादेखत त्यांचा काळजाचा तुकडा हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बसमधील इतर २५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे मेहकर येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारवर कोसळली बस

​लक्झरी बस उलटल्यानंतर ती समोरील मार्गावरून येणाऱ्या ‘एमएच ४० डीई १३४८’ क्रमांकाच्या कारवर जाऊन कोसळली. या कारमध्ये रूपचंद गजानन बावनकुळे व त्यांचे कुटुंबीय प्रवास करत होते. बस कारवर पडल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने, कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बावनकुळे कुटुंबावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

​समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा आणि चालकांचा निष्काळजीपणा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र, आता प्रवाशांच्या जिवाशी खेळून ‘रील’ बनवण्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. अशा बेजबाबदार चालक आणि वाहकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!