बुलढाणा मुख्य पोस्ट ऑफिस उडवून देण्याची धमकी; निनावी ईमेलने मिळाली धमकी; खळबळ

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका निनावी ईमेलद्वारे देण्यात आली. या धमकीमुळे पोलीस प्रशासन आणि पोस्ट कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. मात्र, तासनतास चाललेल्या तपासणीनंतर ही धमकी केवळ एक ‘होक्स कॉल’ (खोडसाळपणा) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुरुवारी २६ मार्च रोजी सकाळी बुलढाणा मुख्य पोस्ट ऑफिसच्या अधिकृत ईमेलवर एक निनावी संदेश प्राप्त झाला. या ईमेलमध्ये पोस्ट ऑफिसच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आणि ती उडवून देण्याचा थेट इशारा देण्यात आला होता. ईमेल वाचताच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची सूचना देण्यात आली.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत पोस्ट ऑफिस परिसर आपल्या ताब्यात घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर काढण्यात आले. तातडीने अकोला येथून BDDS (बॉम्ब शोधक व नाशक पथक) आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले.
तपासणीत काहीही आढळले नाही
साधारण दोन ते तीन तास चाललेल्या या थरारक तपास मोहिमेत पथकाने पोस्ट ऑफिसमधील प्रत्येक पार्सल, कपाटे, कोपरे आणि बाहेरील परिसराची कसून तपासणी केली. मात्र, कोणत्याही प्रकारची स्फोटक वस्तू किंवा संशयास्पद साहित्य आढळले नाही. ही धमकी केवळ खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू
हा ईमेल नेमका कोठून आला? कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला? आणि त्यामागे कोणाचा उद्देश होता? याचा सखोल तपास आता सायबर पोलीस करत आहेत. अशा प्रकारे अफवा पसरवून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.




